द जनसत्ता न्यूज/कवठेमहांकाळ
कवठे महांकाळ/प्रतिनिधी :
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे भेट घेतली.यावेळी कवठे महांकाळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा तसेच शिवसृष्टी व अहिल्यासृष्टी उभारली जावी या मागणीचे निवेदन संदीप गिड्डे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
सध्या कवठे महांकाळ शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य असा तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नाही.छत्रपती शिवाजी महाराज तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे धैर्य,स्वावलंबन आणि दूरदृष्टीचे प्रतीक असून ते प्रेरणा,सकारात्मकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा स्रोत आहेत.हे पुतळे केवळ कलाकृती नसून त्यांच्या युद्धकौशल,उत्कृष्ट नेतृत्व,निःस्वार्थ सेवा,न्यायप्रियता,प्रजाहितदक्षता तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याची वृत्ती या मूल्यांचे स्मरण करून देणारे आणि पुढील पिढ्यांना स्फूर्तीदायक ठरणारे महत्त्वाचे वारसा आहेत असे मत पत्रकारांशी बोलताना संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केले.
या शिवसृष्टी व अहिल्यासृष्टी साठी कवठे महांकाळ शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जुने बसस्थानक येथील जागा,जुने तहसीलदार कार्यालय येथील जागा व जिल्हा परिषदेची जागा शासनास सुचवली असून अशा प्रकारचा प्रस्ताव मागून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
