जनसत्ता न्यूज
कवठे महांकाळ/प्रतिनिधी :
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून,तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.तालुक्यात ८३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.हिंगणगाव येथील मुख्य पूल पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक तात्पुरती पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे.
रविवारी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने तालुक्यातील काही ठिकाणी रस्त्यावर आलेले पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली.सोमवारी दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी अग्रणी नदीच्या हिंगणगाव येथील पुलावरून खंडेराजुरी येथील एक महिला व त्यांचा मुलगा मोटारसायकल वरून जात होते.एकाबाजूला पूल खचल्याने दुसऱ्या बाजूने जाताना रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरील पाण्याच्या प्रवाहात मोटरसायकल घसरून ते दोघे पुराच्या पाण्यात वाहत जाऊ लागले.
घटनास्थळी उपस्थित कवठे महांकाळ नगर पंचायतीचे आरोग्य विभागाचे कर्मचारी श्री.गोविंद थोरवे आणि श्री.विनायक कांबळे यांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी घेतली.वाहत जाणाऱ्या आई व मुलाला वाचविण्यात त्या दोन कर्मचाऱ्यांनी यश मिळवले.त्यांच्या या धाडसी कामगिरीचे तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.गोविंद थोरवे व विनायक कांबळे यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल कवठे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे,मुख्याधिकारी अवधूत कुंभार,नगरसेवक ईश्वर वनखेडे,संजय माने,महेश पाटील,बंधू लाठवडे,अजयकुमार पाटील यांच्यावतीने दोघांचा सत्कार देखील करण्यात आला.

