जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ
ना. चंद्रकांत दादा पाटील यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांत दाद पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ दिले असून जिल्हा विकास नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच काही निधी प्रस्तावित आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे व महेश पाटील, किसान मोर्चा सरचिटणीस संदीप आबा गीड्डे पाटील, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष उदय भोसले, तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील, तासगाव शहराध्यक्ष सौ.स्वाती सूर्यवंशी, विसापूर मंडळ अध्यक्ष उदय राजोपाध्ये, भाजपा सरचिटणीस अनिल लोंढे, आझम मकानदार हे प्रमुख पदाधिकारी आहेत. या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे (पार्टी लाइन )काम केल्याने ना. चंद्रकांत दादा पाटील हे कृपावंत झाले आहेत. जिल्हा विकास नियोजन समितीच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सभागृह मंडप बांधकाम, भूमिगत गटारी, स्मशानभूमी सुशोभीकरण, महावितरण डीपी निधी उपलब्धता, ग्रामीण रस्ते डांबरीकरण, रस्ता खडीकरण तसेच कवठेमंकाळ शहर व तासगाव शहर अंतर्गत विकास कामे आदी कामाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच काही निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.दरम्यान, तासगाव कवठे महांकाळ मतदार संघात भाजप पदाधिकाऱ्यांच्या कडून जिल्हा विकास नियोजन समिती बरोबरच पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना, ग्रामविकास अंतर्गत पंचवीस पंधरा निधी, सार्वजनिक बांधकाम अंतर्गत होणारी कामे रस्ते, पूल या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिले गेले असून त्यांना लवकरच मंजुरी मिळवून येत्या काळात मतदार संघात विकास पर्व सुरू झाल्याचे दिसून येईल. असे भाजप पदाधिकारी यांनी बोलताना स्पष्ट केले.
