कवठे महांकाळ : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात विजेच्या गैरहजेरीत असणाऱ्या पर्यायी व्यवस्था जनरेटर असतील,इन्व्हर्टर असतील सुधारण्यासाठी तसेच वाढवणे बाबतच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना,कवठे महांकाळ तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार श्रीमती केशर खुडे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांना मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून महावितरण कंपनी प्रत्येक मंगळवारी पूर्ण दिवस दुरुस्ती किंवा इतर कामानिमित्ताने वीजपुरवठा खंडित करताना दिसत आहेत.मंगळवार हा बाजाराचा दिवस असल्याने तालुक्यातील छोट्यामोठ्या गावातील शेतकरी,व्यापारीवर्ग यांची वर्दळ कवठे महांकाळ शहराच्या ठिकाणी इतर दिवसापेक्षा मंगळवारी जास्त असते.तालुक्यातील छोट्या मोठ्या गावातून बाजाराच्या निमित्ताने येणारे नागरिक आरोग्याच्या समस्येसाठी कवठे महांकाळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घेत असतात.वाढत्या वर्दळीमुळे अपघाताचे प्रमाण देखील मंगळवारी जास्त असते.
महावितरण कंपनीकडून याच दिवशी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने उपजिल्हा रुग्णालय कवठे महांकाळ येथे असणारे पर्यायी मार्ग जनरेटर,इन्व्हर्टर यांचा पुरेपूर वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे तसेच उपलब्ध साधन सामुग्री देखील अपुरी दिसत आहे.यामुळे अपघाती रुग्णाची हेळसांड होऊन त्यांना आवश्यक सुविधा न भेटल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.सध्या पावसाचे दिवस असल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.परिसरात असणाऱ्या अस्वच्छतेने डासांचे प्रमाण देखील वाढलेले आहे.यामुळे रुग्णालयात दाखल महिला,इतर रुग्णांना आवश्यक पर्यायी व्यवस्था नसल्याने रोगावर उपचार होण्याऐवजी साथीचे आजार पसरवण्याचे केंद्रच उपजिल्हा रुग्णालय कवठे महांकाळ बनल्याचे निदर्शनास येत आहे.
यासर्व बाबींची गंभीर दखल घेऊन विजेच्या गैरहजेरीत आवश्यक असणाऱ्या पर्यायी व्यवस्था लवकरात उपलब्ध करून घेतल्या जाव्यात,खराब असल्यास दुरुस्त करून घेतल्या जाव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच येत्या १५ दिवसात सदरची पर्यायी व्यवस्था न झाल्यास बिनकामी उपजिल्हा रुग्णालयास टाळे ठोकण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कुलकर्णी,कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष कुमार जाधव,तालुका उपाध्यक्ष आदिकराव पोळ,कवठे महांकाळ शहर अध्यक्ष आकाश तेली,विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष महेश साबळे,प्रभाग अध्यक्ष सचिन शिंदे तसेच इतर मनसैनिक उपस्थित होते.