सांगली न्यूज
25/7/2024
कवठे महांकाळ : मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगली आणि कदम हॉस्पिटल,कवठे महांकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर शहरात बुधवार दिनांक २४ जुलै रोजी कदम हॉस्पिटल,नरघोल रोड,कवठे महांकाळ येथे पार पडले.या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्षा मीनाक्षी माने,डॉक्टर प्रवीण कदम आणि डॉक्टर हर्षला कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये डोळ्याचा पडदा,काचबिंदू,लासरु,मोतीबिंदूसाठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया,बिनटाका शस्त्रक्रिया,डोळ्याचा तिरळेपणा यांचे योग्य निदान व त्यावर अल्पखर्चात उपचार करण्यात आले.याशिवाय डोळ्यात वाढलेले मास काढणे,मधुमेहामुळे झालेले नेत्र आजार यांचे मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आजची महागाई पाहता गरिबांना मोतीबिंदू तसेच इतर डोळ्याच्या शस्त्रक्रिया करून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.सामाजिक बांधिलकीतून आपण हे सामाजिक कार्य करीत आहोत.जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून तळागळातील लोकांच्या आरोग्यविषयक ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी यापुढे देखील प्रयत्नशील राहू,असे मत कदम हॉस्पिटलच्या डॉक्टर हर्षला कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी मेहता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,सांगली तसेच कदम हॉस्पिटल,कवठे महांकाळचे कर्मचारी,इतर डॉक्टर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



