सांगली न्यूज
पर्यावरण, झाडे आणि रोपांचे प्रचंड ज्ञान असल्यामुळे तुलसी गौडा यांना 'एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट' असं म्हटलं जातं. त्यांनी आजपर्यंत 40 हजारांहून जास्त झाडं लावली आणि त्यांचं संगोपनही केलं आहे. काही जणांच्या मते हा आकडा एक लाखाहूनही जास्त आहे.
कर्नाटकातील होन्नालीच्या दाट वर्षावनात ८० वर्षांची एक महिला झाडांच्या चांगल्या फांद्या तोडून त्यांच्यापासून नवे रोपटे लावण्यात गुंग आहे. त्या दुर्मिळ जातीचे वृक्ष व बियाण्यांबाबत बोलतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात चमक दिसते. त्यांच्याबाबत त्या असे सांगतात, जसे एखादा विश्वकोश असावा. तेही कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना. या महिला आहेत तुलसी गोविंद गौडा.
त्या सांगतात, मी झाडांनी बहरलेल्या जंगलांना पाहते तेव्हा वाटते, वृक्षतोड न करता माणूस सुखी होऊ शकतो. तुलसी यांनी पूर्ण आयुष्य कर्नाटकात ओसाड जमिनीवर जंगल लावण्यात समर्पित केले आहे. पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी तुलसी यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर ही गोष्ट जगाला समजली. सन्मान स्वीकारण्यासाठी त्या पारंपरिक आदिवासी वेशभूषेत पायात काहीही न घालता आल्या होत्या. संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी चप्पल घातली नाही.
अंगणातील खुर्चीत बसून त्या साधेपणाने सर्वांचे स्वागत करतात. गावातील लोक आदराने त्यांच्या पुढे झुकतात. विद्यार्थ्यांना घेऊन बसेस त्यांच्या घरी येतात. कुटुंबातील दहा सदस्यांसोबत त्या राहतात. तुलसी सांगतात, मुलांना झाडांची माहिती देताना आनंद होतो. त्यांना वृक्षांचे महत्त्व सांगायला हवे. तुलसी यांना आठवत नाही, मात्र त्या १२ व्या वर्षापासून वृक्ष लावणे व त्यांची काळजी घेत आहेत. त्यांनी झाडे लावून इतर ग्रामस्थांच्या विपरीत जंगलतोड रोखण्याचे काम केले. निरोगी झाडाच्या बियांपासून नवीन वृक्ष लावायची हे आईने त्यांना शिकवले.
स्थानिक वन अधिकारी, रहिवाशांच्या नुसार किशोरावस्थेतच त्यांनी घरामागच्या ओसाड भागाला दाट जंगल केले. शेजारी राहणारी रुक्मिणी सांगतात, लहानपणापासूनच त्या वृक्षांसाेबत असे बोलतात जसे आई तिच्या बाळाशी. रुक्मिणीही तुलसीला कामात मदत करतात. वन विभागातील ८६ वर्षांचे रेड्डी सांगतात, नियुक्ती झाल्याच्या पहिल्या दिवशी कडक उन्हात ते तुलसीला भेटले तेव्हा त्या मातीतून दगड, खडे काढून काळजीपूर्वक बिया व रोप लावत होत्या.
देशी जाती ओळखणे, ते गोळा करणे व पोषणाशी संबंधित माहिती तुलसी यांच्याकडे आहे. हे ज्ञान पुस्तकात नाही. त्यांनी तुलसी यांना सल्लागार नेमले. तुलसी यांनी शासकीय नर्सरीत ६५ वर्षे सेवा दिली. १९९८ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही सल्लागार म्हणून कार्यरत आहेत व मौल्यवान माहिती देत आहेत