सांगली न्यूज डिजिटल
लोणारवाडीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार - सातपुते माजी सरपंच
अग्रणीवरील दोन बंधार्यांचे लोणारवाडीत भूमीपूजन
पार पडले. यावेळी अजित खोत , मधुकर सातपुते व ग्रा पं सदस्य उपस्थित होते.
लोणारवाडीच्या शेतीचा आणि प्रश्न अग्रणी नदीवरील २ बंधार्यांमुळे सुटणार असून लोणारवाडीतील सुमारे पाचशे एकर जमिन या बंधार्यामुळे ओलिताखाली येणार आहे. अशी माहीती लोणारवाडीचे लोकनियुक्त सरपंच अजित खोत यांनी दिली.
लोणारवाडी येथे अग्रणी नदीवर दोन कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यांचे भूमीपूजन खोत यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
लोणारवाडीच्या शेतकर्यंाच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून गेली अनेक वर्षे सात्यत्याने प्रयत्न करण्यात येत होते. दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू झाल्यानंतर आम्ही लोणारवाडीला अग्रणी नदीतून पाणी मिळावे म्हणून मागणी करत होतो. काही वेळा पाणी आलेही परंतु पाणी अडवण्याची व जिरवण्याची सोय नसल्याने लोणारवाडीकरांना तात्पुरती मलमपट्टी लावल्यासारखे व्हायचे आणि पाणी बंद झाले की, पुन्हा आमचा शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोंबकळत रहायचा, असेही खोत म्हणाले.
लेणारवाडीच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आम्ही गावातील कार्यकर्ते आणि शेतकरी आमदार सुमनताई पाटील यांच्या कडे गेलो. त्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे लोणारवाडीमध्ये अग्रणीनदीवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे व्हावेत असा आग्रह धरला आणि त्यावेळी जयंतराव पाटील यांना दोन बंधारे मंजूर केले, असे सांगून सरपंच अजित खोत म्हणाले, हे बंधारे होण्यासाठी माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे, युवा नेते रोहित पाटील व महांकाली्च्या अध्यक्षा अनिता सगरे यांनीही या बंधार्यासाठी पाठपुरावा केला.
शेतीच्या पाण्याबरोबरच लोणारवाडी गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही अनेकवेळा गंभीर बनला होता. अग्रणी नदीवर बंधारे झाल्याशिवाय शेतीच्या आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार नव्हता. आता या बंधार्यामुळे भविष्यात शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असल्याचे माजी सरपंच मधुकर सातपुते यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
लोणारवाडीच्या अग्रणी नदीवरील दोन्ही बंधार्याचे काम आपण लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन राजमाने कन्स्ट्रशन कंपनीचे विजय राजमाने व अमोल राजमाने यांनी दिले. तसेच दोन्ही बंधार्यांसाठी सुमारे तीन कोटी रूपये मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच सुर्याबा कोळेकर, एकनाथ खोत, शिवाजी बजबळे, दत्तात्रय खोत, मधुकर खोत, चंद्रकांत वाघमोडे, नामदेव बजबळे, सुभाष गळवे, गंगाराम खोत, सिध्दनाथ खिलारे यांच्यासह शेतकरी, नागरिक उपस्थित होते.