raj thackeray हो मी तुम्हाला घाबरवतोय कारण ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका
सांगली न्यूज
'आजपर्यंतच्या जगभरातील लढाया ह्या जमिनीच्या किंवा भूभागाच्या मालकी हक्कावरूनच झाल्या आहेत आणि मराठी जनांनी जमीन गमावली तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल', असा इशारा राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात स्थानिकांना दिला.
राज ठाकरे अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी स्थानिकांना जमिनी विकण्याचे धोके सांगितले. त्याचबरोबर त्यांनी इतिहासातील काही दाखले देत महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले
या दौऱ्यात माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आजपर्यंतच्या जगभरातील लढाया या जमिनीच्या किंवा भूभागाच्या मालकी हक्कावरूनच झाल्या आहेत आणि मराठी जनांनी जमीन गमावली तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल. शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतू झाला, रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. धनदांडग्यांना आपला रायगड जिल्हा हाकेच्या अंतरावर आला. खरंतर रस्ते हे प्रगतीचे वाहक असतात पण महाराष्ट्रात त्या प्रगतीमागून दबक्या पावलांनी येणारी समाजाची अवनती मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालते. म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी जागल्याची भूमिका घ्यावी, जागृत राहावं... लोकांना शहाणं करावं."
जमीन कुणाच्या घशात जातेय? राज ठाकरेंचा उलट सवाल
"आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड इथे मोठ्या प्रमाणावर कशा जमिनी बळकावल्या जात आहेत ह्याचं पुरेसं भान आपल्याला आलेलं दिसत नाहीये. अलिबागच्या परिसरातील अनेक गावातील जमिनी आज विकल्या गेल्या आहेत. मला समजू शकतं की जमीन विकून मिळणारा पैसा प्रत्येकाला हवा आहे पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जात आहे, तुम्हाला पुरेसा भाव मिळतोय का ह्याची खात्री करून घेताय का?", असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
"जगाचा इतिहास भूगोलाशिवाय नाही. सगळा खटाटोप जमिनीच्या मालकीसाठीच झाला. आज ट्रान्सहार्बर झालाय ह्यामुळे रायगडमधल्या जमिनी स्थानिक लोकांच्या हातातून जाणार, हे नक्की. आज दुबईमध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तिथल्या अरबांना भागीदार करून घ्यावं लागतं तरच तुम्ही तिथे व्यवसाय करू शकता... मग तुम्ही रायगडमध्ये सुरु होणाऱ्या व्यवसायांत तुम्ही भागीदार का होत नाही?", असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
कोणताही राजकीय नेता तुम्हाला हे सांगणार नाही -राज ठाकरे
"आज जमिनींचे जे रजिस्ट्रेशन सुरु आहे त्यात जमिनी कोण घेत आहे ह्याचा एकदा तपास घ्याच. तुम्हालाही कळेल आपण किती बेसावध आहोत ते. आज ठाणे जिल्ह्यात ७ महानगरपालिका आहे, हे का झालं ? कारण बाहेरून येणारे लोंढे. हे आक्रमण आहे हे तुम्हाला जाणवतंय का ? एक दिवस असा असेल तुमच्या हातात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही. तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय, तर हो घाबरवतोय कारण बाकी कुठलाही राजकीय नेता तुम्हाला हे सांगणार नाही", अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली.
