द जनसत्ता न्यूज
हिंद केसरी खेळू नये म्हणून माझ्या मुलाला फसवलं:रफिक शेख
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक केली असून त्याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे.
पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी सिकंदर शेखला अटक केली आहे. पपला गुर्जर टोळीला शस्त्रपुरवठा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी कुस्तीपटू सिकंदर शेखसह पंजाब पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे कुस्तीक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल, चार पिस्तुल, काडतुसांसह स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्याही जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अँक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. संबंधित शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती, असे समजते. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
*सिकंदरने सगळं कष्टानं कमावलेलं - रशीद शेख*
मला पोलिसांनी वा कुणीही माहिती दिली नाही. मला मोबाईलवरून कळालं की सिकंदरला अटक झालीये. सिकंदरने सगळं कष्टाने कमवलंय. सिकंदरशिवाय आमचा कुणीही आधार नाही. सिकंदरवर प्रेम करणारी लोकं लय हायेत. महाराष्ट्र सिकंदरवर प्रेम करतो. त्याच्यासारखा पैलवान पुढं कधीही होणार नाही. पण माझ्या मुलावर अन्याय करू नका. त्यानं सगळं कष्टानं कमावलेलं आहे, असं सिकंदरच्या वडिलांनी म्हटलं आहे.
सिकंदरने एक दोन नाही तर शंभरहून अधिक गदा पटकावल्या आहेत. तो आर्मीमध्ये देखील हवलदार म्हणून कामाला आहे. पंजाब पोलिसांना मी कळकळीची विनंती करतो की, सिकंदरने काहीही केलं नाही, त्याला सोडून द्या. सिकंदरला कुणी अडवकण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्याला देखील माझी विनंती आहे की, त्याला अडकवू नका, तो गरीब पोरगं आहे. त्याच्या वडिलांना शुगर आहे. आईची बीपी वाढली होती, असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं.सिकंदरच्या दोस्त कंपनीने त्याच्यावर अन्याय केला आहे. पंजाबने सिकंदरवर खूप प्रेम केलं आहे. आगामी हिंदकेसरी स्पर्धेत खेळू नये म्हणून सिकंदरला फसवलं गेल्याची शक्यता आहे, असंही रशीद शेख यांनी म्हटलं आहे.
